Type Here to Get Search Results !

जाखडी नाट्यनृत्य - कोकणातील पारंपरिक लोककला

गणा धाव रे, मना पाव रे
हे, गणा धाव रे, मना पाव रे... 
तुझ्या प्रेमाचे किती गुण गाऊ रे
तू दर्शन आम्हांला दाव रे... 

काय मग... वाचता वाचता मनात चाल, पायाने ठेका धरला ना...! 
हे सुप्रसिद्ध बोल आहेत कोकणातल्या लोककलेच्या म्हणजेच "जाखडी नाट्यनृत्याच्या" अजरामर गीताचे.
पूर्वी पारंपारिक लोककला असलेलं हे नाट्यनृत्य आज महाराष्ट्रभर किर्तीस पावलं आहे. "जाखडी" या शब्दप्रयोगाचा एक अर्थ असा की, गोलाकार पद्धतीने 'खडी' म्हणजेच उभे राहून केलेलं नृत्य आणि दुसरा अर्थ असा की 'जाखडी' म्हणजे जखडणे अर्थात नृत्य करणारे नाचात एक प्रकारची शृंखला करतात. जाखडी नृत्याला पुढील नावांनीही ओळखलं जातं : १) शक्तीतुरा/कलगीतुरा २) चवळी नाच/चेऊली नृत्य ३) बाल्या नृत्य. तर आज आपण याच लोकप्रिय जाखडी नाट्यनृत्याविषयी जाणून घेणार आहोत.

खरंतर या जाखडी नाट्यनृत्याची सुरूवात नक्की कधीपासून झाली याबद्दल ठोस माहिती मिळत नाही, पण जुन्या जाणकारांच्या मते फारपूर्वी भातलावणीनंतर मनोरंज म्हणून हे नाट्यनृत्य आयोजित केलं जायचं. आषाढ महिना संपत आला की पावसाला थोडी ओसर लागते. मग श्रावण तग धरू लागतो. लोकांची भातलावणी याच दरम्यान झालेली असते. मग लोकं एकत्र येऊन आपलं मनोरंजन करायचे. मग देवाची गाणी गायची, त्या तालावर नृत्य करायचं. नाचणारे उजव्या पायात चाळ म्हणजेच घुंगरू बांधायचे म्हणुन हा "चवळी नाच".

श्रावण मासात कोकणात खेडोपाडी नाद घुमू लागतात ते जाखडी नृत्याचे. ढोलकीचा नाद घुमायला लागतो; उजव्या पायात चाळ बांधून, सजलेले नटनर्तक तयार होतात. पूर्वी कासोटा बांधुन नाचायचे. त्यानंतर धोतर, पेशवेकालीन पगडी, कंबरेला शेला आला. आता काळानुरूप कपड्यांमध्ये बदल होऊन भरजरी रंगीबेरंगी कपडे वापरले जातात. गायक बुवाने नमनाला "गणा धाव रे, मना पाव रे" असे स्वर पकडल्यावर उत्साहाने नृत्याला सुरुवात करतात. हळूहळू प्रेक्षक श्रोते देखील तालावर ताल धरू लागतात. कोकणकरांना जगण्याची उमेद आणि जीवनात काही काळासाठी सुखद धक्के देण्याचं काम या लोककला करतात. श्रावणात सुरू झालेलं नाट्यनृत्यवादळ दिवाळीपर्यंत कधी कधी तर होळी-शिमग्यावर येऊन थांबतं.

महाराष्ट्रातील लोककलांपैकी सवाल जवाबाची आणि आवाजाच्या फेकाफेकीची जुगलबंदी प्रसिद्ध झाली ती या जाखडी नृत्यामुळेच. हे नृत्य सादर करण्याचा प्रकार देखील विशेष असतो. मध्यभागी गायक; ढोलकी, झांज, मृदंग, बासरी किंवा सनई, टाळ - घुंगरू हे वाद्यवृंद वाजवणारे वादक आणि काही कोरस देणारे हे सर्वजण बसतात. त्यांच्याभोवती गोलाकार पद्धतीने नर्तक नृत्य करतात. यामध्ये प्रथम ईश्वर स्तवन केले जाते. त्यानंतर गण-गौळण गायली जाते. त्यात गण मध्ये गणपती वंदन आणि गौळण मध्ये कृष्णाच्या लीलांचं नृत्यातून सादरीकरण करतात. नंतर सवाल-जवाब, भक्तिपर गाणी, सामाजिक किंवा सध्याच्या परिस्थितीवर प्रबोधन करणारी गाणी गाऊन नृत्य सादर केली जातात.

शक्तीतुरा हे त्यातील प्रसिद्ध नाव. शक्ती म्हणजे आई आदिशक्ती पार्वती आणि तुरा म्हणजे आदिनाथ शिव! या दोघांमधील प्रश्नोत्तरांच्या जुगलबंदीचं मूर्तिमंत रूप म्हणजे "शक्तीतुरा" किंवा "कलगीतुरा"!! शक्तीतुरा जुगलबंदीचे सामने ठिकठिकाणी आयोजित केले जातात. जेथे शक्तीवाले शाहीर गायक विरुद्ध तुरेवाले शाहीर गायक असा सामना भरवला जातो. या शाहीरांची वारसारूपी गायकी घराणी असावीच लागतात. त्यानूसार हे गायक आपली कला सादर करतात. शक्तीवाल्या घराण्यांमध्ये येतात : १) गुरूगणपती घराणं २) गुण हैबती घराणं ३) सदालाल घराणं ४) भानुदास घराणं इ. आणि तुरेवाल्यांमध्ये येतात : १) वासुवाणी घराणं २) शंभूराज घराणं ३) रामचंद्र पंडित घराणं इ. या दोन्ही संप्रदायाच्या शाहीरांना आणि त्यांच्या संघांना पारंपरिक पद्धतीने एकत्र आणून सागरीत केलं जात आणि मांड भरवला जातो. नंतरच या शाहीरांना गाण्यासाठी परवानगी देण्यात येते.

संगीतमय वादविवादाचं हे नाट्यनृत्य शास्त्र, पुराण व लोककथांच्या आधारावर काव्यात्मक आणि संगीतस्वरूपात लोकांसमोर सादर केलं जातं. नृत्यामध्ये सवाल-जवाब स्वरूपाचीही गाणी गायली जातात. सुरुवातीला शक्तीवाले त्यांचा कोडेरूपी प्रश्न विचारतात, मग तुरेवाले शास्त्र, पुराण, ग्रंथ इ. चा आधार घेऊन काव्यातून त्यांना उत्तर देतात. नंतर तुरेवाले कोडेरूपी प्रश्न विचारतात आणि शक्तिवाले त्याच उत्तर काव्यात देतात. असा सवाल-जवाब सामना रंगतो. उजव्या पायात बांधलेल्या घुंगरांचा आवाज, गायकांचा आवाज यामुळे नाचणाऱ्यांच्या अंगात एक वेगळीच स्फूर्ती चढते आणि ते गाणी व वाद्यवृंदाच्या तालावर मध्ये मध्ये आरोळ्या देतात. त्यामुळे सामना अधिक रंगतो. मात्र आता पायात घुंगरू बांधुन नाचणारे कमीच आहेत. 

कोकणपुरती मर्यादीत असलेली कला मुंबईत दाखल झाली आणि याचं स्वरूपंच पालटलं. १९६० ते १९७० च्या दशकात कोकणातून कामानिमित्त मुंबईला आलेले तरूण आपली दिवसभरातील कामं संपल्यावर संध्याकाळी एकत्र जमून आपल्या संस्कृतीची आठवण म्हणून जाखडी नृत्यावर थिरकायची. कोकणातील तरुणांना मुंबईत बाला म्हणायचे व त्यांनी केलेले नृत्य म्हणुन मुंबईतील स्थानिक याला "बाल्या नृत्य" / "बाल्या डान्स" म्हणून संबोधू लागले. हे नृत्य इतकं प्रसिद्ध झालं की या नृत्याचे मुंबईत कार्यक्रम आयोजित केले जातात. मुंबईच्या मिश्र संस्कृतीत बाल्यानृत्याने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

जाखडी नृत्यातील अजून एक प्रकार म्हणजे गोफ गुंफून केलेले नृत्य. गुजरातमधील ‘गोफगुंफन’ व दक्षिणेकडील ‘पिनल कोलाट्टम्‌’ यासारखाच काहीसा हा नृत्यप्रकार आहे. यात वेगवेगळ्या रंगांच्या कपड्यांनी तयार केलेला गोफ मध्यभागी बांधुन त्याचे एक एक टोक प्रत्येक नर्तकाच्या हातात असते. नाचणाऱ्यांची संख्या सहा, आठ, दहा अशी समप्रमाणात असावी लागते. गाण्याच्या तालावर अर्ध्या जोड्या उजवीकडून तर अर्ध्या डावीकडून गोलाकार नागमोडी वळणात नाचतात व गोफ गुंफत जातो. नंतर त्याचप्रमाणे हा गोफ पुन्हा विरुद्ध दिशेने फिरून सोडवलाही जातो.

काही ठिकाणी तर विशिष्ट मानवी मनोरे उभारले जातात. जाखडी नृत्य अगोदर पुरूषच सादर करायचे पण कालांतराने महिला देखील यात संम्मीलीत होऊ लागल्या. आता तर लहान मुलंमुली देखील सादर करतात. जाखडी नाट्यनृत्यातील गाणी इतकी जोशपूर्ण असतात की प्रेक्षक गाण्यांच्या तालावर थिरकलेच पाहीजेत. पण आजकाल प्रसिद्धीच्या आणि पैशाच्या हव्यासापोटी काहीजण या लोककलेला कुरूप करून टाकण्याचं कार्य करतात. द्वीअर्थी किंवा अश्लिल शब्दप्रयोगांचा वापर करतात त्यामुळे या लोककलेच्या सांस्कृतिक आणि पावित्र्यास ठेच लागली जातेय. असो पण आजकालच्या नवपीढीने या नाट्यनृत्यात नवीन रंगं भरण्याचं आणि विविध नाट्यमय बदल करून लोकांचं मनोरंजन करण्याचं काम जोमाने सुरू केलं आहे. यामुळेच का होईना कोकणची ही लोककला सर्वत्र प्रसिद्ध होऊन जोपासली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.